१ राजे 21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठीअहाब आणि नाबोथाचा मळा 1 नंतर असे झाले की, अहाब राजाचा राजवाडा शोमरोनात होता. त्याच्या महालाशेजारी इज्रेल येथे एक द्राक्षाचा मळा होता. तो नाबोथ इज्रेलकर नावाच्या मनुष्याचा होता. 2 एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.” 3 नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणास द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.” 4 तेव्हा अहाब घरी परतला. पण तो नाबोथावर रागावलेला होता. इज्रेलचा हा मनुष्य जे बोलला ते त्यास आवडले नाही. (नाबोथ म्हणाला होता, “माझ्या कुटुंबाची जमिन मी तुम्हास देणार नाही)” अहाब अंथरुणावर पडला त्याने तोंड फिरवून घेतले आणि अन्नपाणी नाकारले. 5 अहाबाची पत्नी ईजबेल त्याच्याजवळ गेली. त्यास म्हणाली, “तुम्ही असे खिन्न का? तुम्ही जेवत का नाही?” 6 अहाब म्हणाला, “इज्रेल येथल्या नाबोथाला मी त्याचा मळा मला द्यायला सांगितला ‘त्याची पूर्ण किंमत मी मोजायला तयार आहे किंवा हवे तर दुसरी जमीन द्यायला तयार आहे हे ही मी त्यास सांगितले. पण नाबोथ त्याचा मळा द्यायला कबूल होत नाही.” 7 ईजबेल त्यास म्हणाली, “पण तुम्ही तर इस्राएलाचे राजे आहात. उठा, काहीतरी खा म्हणजे तुम्हास बरे वाटेल. नाबोथ इज्रेलकरचा मळा मी आपल्याला मिळवून देईन.” 8 ईजबेलने मग काही पत्रे लिहिली. पत्रांवर तिने अहाबाची सही केली. अहाबाच्या शिक्का वापरुन पत्रांवर तो शिक्का उमटवला. मग तिने ही पत्रे नाबोथाच्या गावच्या वडिलधाऱ्या मंडळींना आणि थोरामोठ्यांना पाठवली. 9 पत्रातला मजकूर असा होता: “एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांस एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल. 10 नाबोथाबद्दल खोट्या गोष्टी सांगणारी काही अधम माणसे जमवा. नाबोथ राजाविरुध्द आणि देवाविरुध्द बोलला, हे आम्ही ऐकले, असे त्या मनुष्यांनी म्हणावे. एवढे झाल्यावर नाबोथला गावाबाहेर घालवून दगडांचा वर्षाव करून मारा.” 11 ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे इज्रेलमधल्या गावातील वयाने आणि मानाने वडिलधाऱ्या (पुढ्याऱ्यांनी) मंडळींनी ही आज्ञा मानली. 12 त्यांनी उपवासाचा म्हणून एक दिवस घोषित केला. त्यादिवशी सर्व लोकांस सभेत बोलावले. नाबोथला सर्वांसमोर खास आसनावर बसवले. 13 मग, “नाबोथ देवाविरुध्द आणि राजाविरुध्द बोलल्याचे आपण ऐकले आहे” असे दोन अधम मनुष्यांनी साक्ष सांगितली. तेव्हा लोकांनी नाबोथला गावाबाहेर घालवले आणि तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. 14 मग त्या प्रतिष्ठित मनुष्यांनी ईजबेलकडे निरोप पाठवला. “नाबोथचा वध झाला आहे.” असा तो निरोप होता. 15 ईजबेलने हे ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, “नाबोथ मेला. आता तुम्हास नाबोथ इज्रेलकरचा हवा होता तो मळा तुम्ही जाऊन ताब्यात घेऊ शकता” जो तो पैसे घेऊनही ताब्यात द्यायला तयार नव्हता नाबोथ आता जिवंत नाही मेला आहे. 16 यावर इज्रेलकर नाबोथ आता मरण पावला आहे हे अहाबाने ऐकले तेव्हा त्याने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला. 17 यावेळी परमेश्वर एलीया तिश्बीशी बोलला, 18 “ऊठ शोमरोनमधल्या इस्राएलचा राजा अहाबाकडे जा तो नाबोथाच्या द्राक्षमळ्यात असेल. तो मळा वतन करून घ्यायला तिथे गेला आहे. 19 अहाबाला जाऊन सांग की परमेश्वर म्हणतो, ‘अहाब, नाबोथला तू मारलेस. आता त्याचा मळा वतन करून घ्यायला निघालास तेव्हा आता मी सांगतो ते ऐक. नाबोथ मेला त्याच जागी तू सुध्दा मरशील ज्या कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटले तीच कुत्री त्याच ठिकाणी तुझे रक्त चाटतील.” 20 तेव्हा एलीया अहाबाकडे गेला. अहाबाने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, तुला मी पुन्हा सापडलो. “तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस” एलीया म्हणाला, हो, “तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस. 21 तेव्हा परमेश्वर तुला काय सांगतो ते ऐक, मी तुझा नाश करीन. मी तुला आणि तुझ्या कुटुंबातील सर्व पुरुषांना तो इस्राएलात कोंडलेला असो किंवा मोकळा असो त्यास मी ठार करीन. 22 नबाटाचा पुत्र यराबाम याच्या कुटुंबासारखीच तुझ्या घराचीही वाताहत होईल. अहीयाचा पुत्र बाशाच्या कुटुंबासारखीच तुझी दशा होईल. या दोन्ही घराण्यांचा समूळ नाश झाला. तू माझा क्रोध जागा केलास. इस्राएल लोकांसही पाप करायला लावलेस.” 23 शिवाय परमेश्वर असे म्हणतो, “तुझी पत्नी ईजबेल हिच्या शरीरावर इज्रेलमध्ये कुत्री तुटून पडतील. 24 अहाबाच्या घरातल्या ज्याला कुणाला गावात मरण येईल त्यास कुत्री खातील आणि जो कोणी शेतात मरेल तो पक्ष्यांचे भक्ष्य होईल” 25 अहाबाने जितकी पापे केली, जितके अपराध केले तेवढे कोणीच केले नाहीत. त्याची पत्नी ईजबेल हिने त्यास भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने हे सर्व करायला लावले. 26 अहाबाने आणखी एक पातक केले ते म्हणजे अमंगळ मूर्तींची पूजा केली. अमोरी लोकांनीही हेच केले तेव्हा परमेश्वराने त्यांच्याकडून हा प्रदेश काढून घेऊन इस्राएल लोकांस दिला. 27 एलीयाचे बोलून झाल्यावर अहाबाला फार दु:ख झाले. दु:खाने त्याने अंगावरचे कपडे फाडले. मग विशेष शोकवस्त्रे परिधान केली. त्याने अन्नत्याग केला. त्याच कपड्यात तो झोपला. तो अतिशय दु:खी आणि खिन्न झाला होता. 28 परमेश्वर एलीया तिश्बी संदेष्ट्याला म्हणाला, 29 “अहाब माझ्यापुढे नतमस्तक झाला आहे असे दिसते. तेव्हा तो जिवंत असेपर्यंत मी त्यास संकटात लोटणार नाही. त्याचा पुत्र राज्यावर येईपर्यंत मी थांबेन. मग त्याच्या घराला मी उपद्रव देईन.” |
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.