Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ राजे 2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


शलमोनाला दाविदाने दिलेली ताकीद

1 दाविदाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला आज्ञा देऊन सांगितले,

2 “आता मी जगाच्या रीतीप्रमाणे जाणार आहे. तर तू हिमंत धर, खंबीर, जबाबदार पुरुष हो.

3 आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर त्याच्या मार्गाने जा, परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम, कराराचे आदेश, व निर्णय काटेकोरपणे मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यामध्ये यशस्वी होशील.

4 तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने, तुझे पुत्र चालले, तर इस्राएलाच्या राजासनावरून तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.

5 सरुवेचा पुत्र यवाब याने माझ्याशी काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे, शांततेच्या काळात त्याने हा रक्तपात केला आहे व त्याची तलवार खोचायचा कमरबंद आणि त्याच्या पायातले सैनिकी जोडे त्यांच्या रक्ताने रक्ताळलेले आहेत.

6 तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देऊ नको.

7 गिलादाच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर दया असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशालोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.

8 गेराचा पुत्र शिमी तुझ्याजवळ आहे हे लक्षात ठेव, तो बहूरीम मधला बन्यामिनी आहे. मी महनाईमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट शापाचे उद्गगार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्यास मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की, मी तुला तलवारीने ठार करणार नाही.

9 पण आता त्यास तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्यास काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.”


दाविदाचा मृत्यू
1 इति. 3:4 ; 29:26-28

10 मग दावीद मरण पावला. त्याच्या पुर्वजांसारखे दावीद नगरात त्याचे दफन झाले.

11 हेब्रोनवर सात वर्ष आणि यरूशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दाविदाने इस्राएलावर राज्य केले.

12 आता शलमोन आपल्या वडिलांच्या दाविदाच्या राजासनावर बसला. व त्याची सत्ता बळकटीने स्थापन झाली.


शलमोन आपल्या राज्याला बळकटी आणतो

13 यानंतर हग्गीथेचा पुत्र अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्यास विचारले, “तू शांतीने आला आहेस ना?” अदोनीया म्हणाला, हो, “ही शांतता भेट आहे.”

14 “मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” बथशेबा म्हणाली, “मग बोल.”

15 अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की, हे राज्य माझे होते. तुम्हास हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलाच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे.

16 आता माझे एक मागणे आहे. कृपाकरून नाही म्हणू नकोस” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.

17 अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”

18 बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”

19 मग बथशेबा राजा शलमोनाकडे अदोनीयाच्या वतीने बोलण्यास गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करून तो राजासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे राजासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.

20 नंतर बथशेबा त्यास म्हणाली, “मला एक छोटीशी विनंती तुझ्याजवळ करायची आहे. कृपाकरून नाही म्हणून नकोस” राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”

21 ती म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”

22 राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी केवळ शुनेमकरीण अबीशगेची मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी राज्यदेखील का मागत नाहीस, तो माझा मोठा भाऊ आहे म्हणून आणि याजक अब्याथार आणि यवाब, सरुवेचा यांच्यासाठी देखील राज्य माग.”

23 मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन राजा म्हणाला, “अदोनीयाने ही मागणी करून आपल्या जीवावर संकट आणले आहे; तसे न घडले तर परमेश्वर तसेच त्यापेक्षा अधिक माझे करो.

24 इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझे वडिल दावीद यांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”

25 राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाला आज्ञा दिली; आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.

26 मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्या घरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडिल दावीदाबरोबर मार्गक्रमण करतांना परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू दाविदाला साथ दिली आहेस”

27 शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते परमेश्वर जे बोलला ते पूर्ण व्हावे म्हणून, परमेश्वराच्या याजक पदावरून शलमोनाने अब्याथार याजकाला काढून टाकले.

28 ही बातमी यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घट्ट धरुन बसला.

29 “कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे” हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने यहोयादाचा पुत्र, बनाया यास पाठवले, तो त्यास म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.”

30 बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.” पण यवाब म्हणाला “मी येथेच मरेन.” तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्यास हे सांगितले यवाब म्हणतो मी वेदीपाशीच मरेन.

31 तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्यास तिथेच ठार कर, मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय.

32 त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील, माझे वडिल दावीद यास नकळत नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा या आपल्यापेक्षा न्यायी व चांगल्या अशा दोन मनुष्यांना त्याने तलवारीने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता.

33 त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी त्याच्या संततीच्या शिरी उलटवून सर्वदा राहील. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना परमेश्वराच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”

34 तेव्हा यहोयादाचा पुत्र बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले.

35 यवाबाच्या जागी राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथाराच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकाची केली.

36 मग राजाने शिमीला बोलावणे पाठवले. त्यास सांगितले, “इथे यरूशलेमामध्ये स्वत:साठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको.

37 हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. व तुझे रक्त तुझ्या माथी असेल.”

38 तेव्हा शिमी राजाला म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमचा दास तुमच्या सागंण्याप्रमाणे करील,” मग शिमी यरूशलेमेमध्येच पुष्कळ दिवस राहिला.

39 पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. “गथचा राजा आणि माकाचा, पुत्र आखीश याच्याकडे ते गेले, आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कोणीतरी कळवले.”

40 तेव्हा शिमीने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो गथ येथे आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.

41 शिमी यरूशलेमेहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले.

42 तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले. शलमोन त्यास म्हणाला, “यरूशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला परमेश्वराची शपथ घेऊन सांगितले होते ना? तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील? आणि तू त्यास कबूल झाला होतास. तू म्हणतोस ते मान्य आहे.

43 परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेली आज्ञा तू का मानली नाहीस?”

44 मग राजा शिमीस म्हणाला, “माझे वडिल दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस ते तुला माहीती आहेत तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे फळ तुझ्या माथी आनील.

45 पण शलमोन राजाला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दाविदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.”

46 मग राजाने यहोयादाचा पुत्र बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan