Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ राजे 18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तेव्हा पुष्कळ दिवसानी, तिसऱ्या वर्षी, एलीयाकडे परमेश्वराचे वचन आले, ते असे की, “जा, आणि अहाब राजाच्या नजरेत ये आणि मग मी भूमीवर पाऊस पाडणार.”

2 तेव्हा एलीया अहाबाच्या समोर जायला निघाला. तेव्हा शोमरोनात भंयकर दुष्काळ होता.

3 अहाब राजाने आपल्या महालाचा प्रमुख ओबद्या याला बोलावणे पाठवले. पण ओबद्या परमेश्वराचा फार मान राखत असे.

4 जेव्हा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले व त्यांच्या अन्नपाण्याचीही तरतूद केली.

5 अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “देशातील सगळ्या पाण्याच्या ओहोळ व झऱ्यांवर जा, कदाचित खेचरे, घोडी वाचतील एवढे गवत मिळणार आणि म्हणजे सर्व पशू मरणार नाहीत.”

6 तेव्हा त्या दोघांनी तो प्रदेश पाहणी करण्यास आपसांत वाटून घेतला, अहाब स्वत:हा एका वाटेने गेला व ओबद्या दुसऱ्या वाटेने गेला.

7 आणि ओबद्या वाटेत असता, एलीया अनपेक्षीतपणे त्यास भेटला. तेव्हा ओबद्याने त्यास ओळखले व जमीनीवर उपडे पडून त्यास म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”

8 एलीया म्हणाला, “होय, मीच आहे. आता मी इथे असल्याचे आपल्या धन्याला सांग.”

9 तेव्हा ओबद्या म्हणाला, “मी काय अपराध केला ज्यावरून तू आपल्या सेवकाला जीवे मारायला अहाबाच्या हाती देतोस?

10 परमेश्वर तुझा देव जिवंत आहे, माझा स्वामीने सर्वत्र तुमचा शोध करायला पाठवले नसेल असे कुठलेच गाव किंवा राज्य नाही. ज्याठिकाणी तुम्ही सापडला नाहीत, असे कळले, तेव्हा आपण सापडलात नाही अशी शपथ त्याने त्या राज्याला व राष्ट्राला घ्यायला लावली.

11 आणि आता तुम्ही मला म्हणता, ‘जा जाऊन तुझ्या स्वामीला सांग एलीया या ठिकाणी आहे.’

12 तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले, तर परमेश्वराचा आत्मा तुम्हास दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. तरी मी, तुझा सेवक, लहानपणापासून परमेश्वराचे स्तवन करत आहे.

13 ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा जे मी केले ते माझ्या धन्याला माहीत नाही काय? मी परमेश्वराच्या शंभर संदेष्ट्यांना पन्नास पन्नास असे गुहांमध्ये लपवले आणि त्यांना खायला प्यायला पुरवले.

14 आणि आता तुम्ही म्हणता, ‘जा आपल्या धन्याला सांग की एलीया या ठिकाणी आहे,’ मग तो मला जीवे मारील.”

15 यावर एलीया त्यास म्हणाला, “सैन्यांचा परमेश्वर ज्याच्या समोर मी उभा राहतो तो जिवंत आहे, मी खचित त्याच्या दृष्टीस पडेन.”

16 तेव्हा ओबद्याने अहाबाला जाऊन सांगितले, आणि अहाब एलीयाला भेटण्यासाठी निघाला.

17 अहाबाने एलीयाला पाहिले तेव्हा तो त्यास म्हणाला, “इस्राएलाला त्रस्त करून सोडणारा तूच का तो?”

18 एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही तर तुम्ही आणि तुमचे वडिल यांच्यामुळे ते उद्भवलेले आहे. कारण तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून बआल दैवतांच्या मागे लागलात.

19 तर आता सर्व इस्राएलाला, बआलाच्या साडेचारशे संदेष्टे व तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. जे ईजबेल मेजावर जेवणारे यांना घेऊन कर्मेल पर्वतावर ये.”


एलीया अहाबाकडे येतो

20 तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले.

21 तेव्हा एलीया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्यास अनुसरा. पण बआल खरा देव असेल तर त्यास अनुसरा.” लोक यावर एका शब्दानेही त्यास उत्तर देऊ शकले नाही.

22 मग एलीया लोकांस म्हणाला, “मी, मीच फक्त परमेश्वराचा संदेष्टा असा राहलो आहे, पण बआलाचे चारशेपन्नास संदेष्टे आहेत.

23 तेव्हा त्यांनी आम्हांला दोन गोऱ्हे द्यावे, त्यांनी आपणासाठी त्यातून एक गोऱ्हा निवडून त्याचे तुकडे करावे व लाकडे रचून त्यावर ठेवावे, मात्र त्याखाली विस्तव पेटवू नये. मग मी दुसरा गोऱ्हा तयार करून ठेवीन व विस्तव लावणार नाही.

24 तेव्हा तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या व मी परमेश्वराचे नाव घेईन, आणि जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.” तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले, “हे चांगले आहे.”

25 मग एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा पहिल्याने तुम्ही आपणासाठी एक गोऱ्हा निवडून घेऊन तयार करा आणि विस्तव न लावता आपल्या देवाचे नाव घ्या.”

26 तेव्हा त्यांना दिलेला गोऱ्हा त्यांनी घेऊन तयार केला, आणि सकाळ पासून दुपारपर्यंत त्यांनी बआलाचे नाव घेऊन त्यास हाक मारून म्हटले, “हे बाला, आमच्या हाकेला उत्तर दे.” पण कसलीही वाणी नव्हती आणि उत्तर देणाराही कोणी नव्हता. जी वेदी त्यांनी बांधली होती तिच्या भोवती ते नाचू लागले.

27 दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादयावेळी प्रवासात किंवा झोपेत असले. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करून त्यास उठवा.”

28 तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वत:वर वार करून घेतले. (ही त्यांची पूजेची पध्दत होती) त्यांचे अंग रक्ताळले.

29 दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते भविष्य सांगत होते. पण काहीही घडले नाही बालाकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!

30 मग एलीया सर्व लोकांस उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले.

31 एलीयाने बारा दगड घेतले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबाच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबालाच परमेश्वराने इस्राएल या नावाने संबोधले होते.

32 परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती.

33 एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. “गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले.”

34 मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या होमार्पणाच्या लाकडावर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले.

35 वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले.

36 दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे.

37 हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.”

38 तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले.

39 सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.

40 एलीया म्हणाला, “त्या बआलाच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसटू देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.


पावसासाठी एलीयाची प्रार्थना

41 एलीया मग अहाब राजाला म्हणाला, “जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे”

42 तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोंचल्यावर ओणवून, गुडघ्यात डोके घालून बसला.

43 आणि आपल्याबरोबरच्या सेवकाला म्हणाला, “समुद्राकडे पाहा” समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला, “तिथे काहीच दिसले नाही” एलीयाने त्यास पुन्हा सात वेळेस जाऊन पाहायला सांगितले.

44 सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, एक लहानसा, मुठीएवढा ढग मला दिसला. समुद्रावरुन तो येत होता तेव्हा एलीयाने त्या सेवकाला सांगितले, “अहाब राजाकडे जाऊन त्यास रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग. कारण तो आत्ता निघाला नाहीतर पावसामुळे त्यास थांबावे लागेल.”

45 पाहता पाहता आकाश ढगांनी भरुन गेले. वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. अहाब आपल्या रथात बसून इज्रेलला परत जायला निघाला.

46 परंतु एलीयावर परमेश्वराचा हात असल्यामुळे, धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरून घट्ट खोचले आणि सरळ इज्रेलपर्यंत तो अहाबाच्या पुढे धावत गेला.

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan