Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

१ राजे 1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी


अबीशग दावीदाची शुश्रूषा करते

1 आता राजा दावीद म्हातारा होऊन उतारवयात पोहोंचला होता. त्यांनी त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्यास ऊब येईना.

2 म्हणून त्याचे सेवक त्यास म्हणाले, “आपण आपल्या प्रभूराजासाठी एखादी तरुण कुमारी पाहूया. अशासाठी की तिने राजाची सेवा करावी आणि काळजी घ्यावी. आपल्या प्रभूराजाला ऊब यावी म्हणून ती तुझ्या उराशी निजेल.”

3 आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलामध्ये सुंदर तरुण कन्यांचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची कन्या सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.

4 ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.


अदोनीया गादी हिरावून घेतो

5 तेव्हा हग्गीथ्थेचा पुत्र अदोनीया स्वत:ला उंच करून म्हणाला, “मी राजा होईन.” त्याने स्वत:समोर रथ, घोडे तयार केले आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे ठेवली.

6 “तू असे का करतोस?” असे म्हणून दाविदाने त्यास कधी दुखावलेले नव्हते, शिवाय अदोनीया हा दिसायलाही सुंदर होता, अबशालोमानंतर त्याचा जन्म झाला होता.

7 सरूवेचा पुत्र यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्यांनी अदोनीयाला अनुसरून त्यास सहाय्य केले.

8 पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमी रेई आणि दाविदाच्या पदरी असलेले वीर, ह्यानी अदोनीयाला अनुसरले नाही.

9 एन-रोगेलजवळ जोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे कापले व आपले भाऊ, राजाची मुले आणि यहूदातील सर्व लोकांस, जे राजाचे चाकर होते त्यांना बोलावले.

10 पण राजाचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना त्याने बोलावले नाही.

11 तेव्हा शलमोनाची आई बथशेबा हिच्याशी नाथान बोलला, “हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा राजा झाला, आणि आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्तासुद्धा नाही, असे तुझ्या कानावर आले नाही काय?”

12 तर आता चल मी तुला सल्ला देतो, अशारितीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील.

13 तर आता तू दावीद राजा कडे जा आणि त्यास म्हण की, माझ्या स्वामी तुम्ही मला वचन दिले नाही काय? “खचित तुझा पुत्र शलमोन माझ्यानंतर राज्य करील, आणि तोच माझ्या राजासनावर बसेल?” तर मग अदोनीया का राज्य करीत आहे?

14 “तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन व तुझ्या शब्दांची खात्री पटवून देईन.”

15 तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या खोलीत गेली राजा फारच थकला होता, शुनेमची अबीशग राजाची सेवा करत होती.

16 बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजा म्हणाला, “तुझी काय इच्छा आहे.”

17 ती त्यास म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे की, माझ्यानंतर शलमोन राजा होईल व तोच या राजासनावर बसेल असे तुम्ही म्हणाला आहात.

18 तर आता पाहा, अदोनीया राजा झाला आहे, आणि तुम्ही माझे स्वामी महाराज, तुम्हास याची माहितीही नाही का?

19 त्याने तर अनेक गुरे आणि पुष्ट पशू, उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे, त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुले, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे. पण तुमचा सेवक शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही.

20 महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत.

21 नाहीतर माझे स्वामी राजे आपल्या वाडवडिलांसारखे झोपल्यावर, मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”

22 बथशेबा हे राजाशी बोलत असतानाच, नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला.

23 राजाच्या सेवकांनी त्यास सांगितले, “तेव्हा नाथान संदेष्टा राजाच्या समोर आला” व खाली लवून अभिवादन केले.

24 मग नाथान म्हणाला, “महाराज, तुमच्यानंतर अदोनीया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय? आणि तो तुमच्या राजासनावर बसेल असे तुम्ही ठरवले आहे काय?”

25 कारण आजच त्याने खाली जाऊन गुरे, पुष्ट पशू, मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमचे पुत्र, सेनापती, व अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत, “राजा अदोनीया चिरायु होवो” म्हणून घोषणा देत आहेत.

26 पण मी, सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया आणि तुमचा सेवक शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही.

27 माझे स्वामी, राजा आपल्याकडून हे आम्हाला न सांगता झाले का? यानंतर राजासनावर कोण बसेल? हे तुझ्या सेवकांना कळव.


शलमोनाचा राज्याभिषेक
1 इति. 29:22-25

28 तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला पुन्हा माझ्याकडे बोलवा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर येवून उभी राहिली.

29 मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो.

30 पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राज्य करील, या राजासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. आजच हे मी पूर्ण करील.”

31 बथशेबाने हे ऐकून राजाला लवून वंदन केले व म्हणाली, “माझे स्वामीराज दावीद चिरायु होवो.”

32 मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले.

33 राजा त्यांना म्हणाला, माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून खाली गीहोनाकडे जा.

34 तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्यास इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की “शलमोन राजा चिरायू असो.”

35 मग त्यास घेऊन माझ्याकडे या. तो या राजासनावर बसेल आणि राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा अधिकारी व्हावा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.

36 यहोयादाचा पुत्र बनाया राजाला म्हणाला, “आमेन! परमेश्वर, माझ्या स्वामीचा देव याला मान्यता देवो.

37 महाराज, जसा परमेश्वर आपल्याबरोबर होता. तोच परमेश्वर तसाच शलमोनाच्याही बरोबर राहील, आणि राजा शलमोनच्या राज्याची भरभराट करो आणि माझे स्वामी, दावीद आपल्यापेक्षा त्याचे राजासन महान करो.”

38 सादोक याजक, नाथान भविष्यवादी, यहोयादाचा पुत्र बनाया आणि राजाचे सेवक करेथी व पलेथी यांनी खाली जाउन राजा दाविदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दाविदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.

39 सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.

40 मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांस उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.

41 हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे?”

42 यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान तिथे आला. अदोनीया त्यास म्हणाला, “ये तू भला मनुष्य आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”

43 पण योनाथानाने अदोनीयाला उत्तर देऊन म्हणाला, “आमचा स्वामी, दावीद याने शलमोनाला राजा केले आहे.”

44 दाविदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी आणि पलेथी आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले.

45 मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहोन येथे शलमोन राजाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण आनंदाने नगरात परतले, नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे.

46 शलमोन आता राज्याचा राजासनावर बसला आहे.

47 राजाचा सेवकवर्ग स्वामी दावीद राजाला आशीर्वाद देत आहे. ते म्हणत आहेत, राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे देव शलमोनाचे नाव तुमच्यापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याचे राजासन तुझ्या राजासनापेक्षाही थोर होवो. तेव्हा पलंगावरूनच वाकून राजा अभिवादन करत होता.

48 आणि राजा म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देव धन्य असो. परमेश्वराने माझ्या डोळ्यादेखत एका व्यक्तीला माझ्या राजासनावर बसवले आहे.”

49 हे ऐकून अदोनीयाची आमंत्रित पाहुणे मंडळी घाबरली आणि त्यांनी तेथून पळ काढला.

50 अदोनीया शलमोनाला घाबरला, व जावून तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे पकडून बसला.

51 कोणीतरी शलमोनाला सांगितले, “अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही शलमोन राजाने मला तलवारीने मारणार नाही याचे अभिवचन द्यावे असे तो म्हणत आहे.”

52 तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसासही इजा होणार नाही. पण त्याच्यात दुष्टता दिसली तर तो मरण पावेल.”

53 मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या मनुष्यांना पाठवले, ते त्यास राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. “शलमोनाने त्यास घरी परत जाण्यास सांगितले.”

MAR-IRV

Creative Commons License

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.

Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd.
Lean sinn:



Sanasan