फिलिप्पैकरांस 3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीदैहिक गोष्टींवर भरवसा नको 1 बंधू व भगिनींनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा लिहिण्याचा मला त्रास होत नाही आणि हे तुमच्या संरक्षणासाठी आहे. 2 त्या कुत्र्यांपासून, दुष्ट कृत्ये करणारे, देहाची विच्छिन्नता करणार्यांपासून सावध राहावे. 3 कारण वास्तविक सुंता झालेले आपणच आहोत आणि जे आपणही आत्म्याद्वारे परमेश्वराची सेवा करतो व ख्रिस्त येशूंमध्ये अभिमान बाळगतो आणि देहावर भरवसा ठेवत नाही. 4 तरी देखील मला देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत. जर काहींना वाटते की त्यांना देहावर भरवसा ठेवण्यास कारणे आहेत, तर मला अधिक आहेत. 5 मी आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएली लोकातील, बन्यामीन वंशातील, इब्र्यांचा इब्री; नियमशास्त्रानुसार परूशी असा होतो; 6 आणि आवेशाविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी दोषरहित होतो. 7 परंतु जो काही मला लाभ होतो, तो सर्व मी ख्रिस्तासाठी हानी समजलो आहे. 8 यापेक्षाही अधिक, ख्रिस्त येशू माझे प्रभू, यांच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानासाठी मी सर्वकाही हानी असे समजतो व त्यासाठी मी सर्वगोष्टी गमावल्या आहेत व मी त्या कचर्यासमान लेखतो यासाठी की ख्रिस्त मला प्राप्त व्हावे. 9 आणि मी त्यांच्यामध्ये सापडावे आणि नियमांद्वारे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, परंतु ख्रिस्तामधील विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व परमेश्वरावरील विश्वासाने प्राप्त होते. 10 मी ख्रिस्ताला आणि त्यांच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य, व त्यांच्या दुःखसहनाची सहभागिता जाणून त्यांच्या मृत्यूशी अनुरूप व्हावे. 11 आणि कसेही करून मी मृतांमधून पुनरुत्थान प्राप्त करून घ्यावे. 12 मी सर्वकाही मिळविले किंवा माझ्या ध्येयाप्रत पोहोचलो आहे असे नाही, परंतु ते आपलेसे करण्यासाठी व घट्ट धरून ठेवण्यासाठी मी नेटाने पुढे जात आहे. कारण मला ख्रिस्त येशूंनी पकडून ठेवले आहे. 13 बंधू व भगिनींनो, मी अजूनही ते प्राप्त केलेले नाही, परंतु मी एक गोष्ट करतो: मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे नेटाने लक्ष लावतो. 14 ख्रिस्त येशूंमध्ये परमेश्वराच्या स्वर्गीय पाचारणासंबंधीचे पारितोषिक जिंकण्यासाठी मी त्या लक्ष्याकडे धावत आहे. पौलाचे अनुकरण 15 आपण जे सर्व परिपक्व आहोत त्यांनीही हाच भाव ठेवावा. जर एखाद्या गोष्टीसंबंधाने तुमचे विचार वेगळे असतील तर परमेश्वर ती गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतील. 16 जसे येथवर आपण पोहोचलो आहोत त्याप्रमाणे चालत राहावे. 17 प्रिय बंधू व भगिनींनो, माझे अनुकरण करणारे व्हा, जसा आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिला त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. 18 कारण मी हे पूर्वी तुम्हाला सांगितले आणि आताही रडत सांगतो की अनेक लोक असे जगतात जसे ते ख्रिस्ताच्या क्रूसखांबाचे शत्रू आहेत. 19 त्यांचा शेवट तर विनाश आहे, कारण पोट हेच त्यांचे दैवत आहे; निर्लज्जपणा त्यांचे गौरव आहे आणि त्यांचे मन भौतिक गोष्टींकडे लागलेले आहे. 20 परंतु आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे आणि तिथून आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या परतण्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. 21 जे त्या सामर्थ्याद्वारे सर्वकाही त्यांच्या नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे, ते आपली अशक्त शरीरे घेऊन व त्यांचे रूपांतर करून ती स्वतःच्या शरीरासारखी गौरवशाली शरीरे करतील. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.