Biblia Todo Logo
Online Bible

- Advertisements -


फिलिप्पैकरांस 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


नमस्कार

1 फिलिप्पै येथील सर्व अध्यक्ष1 व सर्व सेवक2 ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूच्या ठायी असणार्‍या सर्व पवित्र जनांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तीमथ्य ह्यांच्याकडून :

2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.


पौलाची कृतज्ञता व आनंद

3 मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो;

4-5 पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता तिच्यामुळे मी तसे करतो; आणि तुम्हा सर्वांसाठी नेहमी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस आनंदाने विनंती करतो.

6 ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे.

7 तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेचे भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हांला बाळगून आहे.

8 माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे.

9 माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी;

10 असे की, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे;

11 आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.


पौलाच्या बंदिवासाचे सुपरिणाम

12 बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे;

13 म्हणजे कैसराच्या हुजरातीच्या सर्व सैनिकांत व इतर सर्व जणांत, माझी बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली;

14 आणि त्यांची खातरी पटून प्रभूमधील बहुतेक बंधू माझ्या बंधनांमुळे उत्तेजित होऊन देवाचे वचन निर्भयपणे सांगण्यास अधिक धीट झाले आहेत.

15 कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात; आणि कित्येक सद्भावाने करतात.

16 मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात;

17 पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावीत अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात.


ख्रिस्तघोषणा होत असल्याबद्दल पौलाला झालेला आनंद

18 ह्यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते; आणि ह्यात मी आनंद करतो व करणारच.

19-20 कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे.


जीवन की मरण, कोणते चांगले?

21 कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे.

22 पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही.

23 मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.

24 तरी मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे.

25 मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार; आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे;

26 हे अशासाठी की, तुमच्याकडे माझे पुन्हा येणे झाल्याने, माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे.


धैर्य धरावे म्हणून बोध

27 सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता;

28 आणि विरोध करणार्‍या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाहीत; हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे, आणि ते देवापासून आहे.

29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.

30 मी जे युद्ध केले ते तुम्ही पाहिले, व आता मी जे करत आहे म्हणून तुम्ही ऐकता, तेच तुम्हीही करत आहात.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Follow us:



Advertisements