फिलिप्पैकरांस INTRO1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)प्रस्तावना हे बोधपत्र युरोपमध्ये मासेदोनिया नावाच्या रोमन प्रांतात फिलिप्पै येथे पौलाने स्थापन केलेल्या ख्रिस्तमंडळीला लिहिलेले आहे. त्या वेळी पौल तुंरुगात होता व बऱ्याच विरोधाला तोंड देत होता. फिलिप्पै येथील ख्रिस्तमंडळीमध्ये दिशाभूल करणारे तथाकथित धर्मशिक्षक कार्य करीत होते म्हणूनदेखील पौल फारच अस्वस्थ झाला होता. तरीही या बोधपत्रामध्ये त्याचा आनंद व आत्मविश्वास जाणवतो, हे पौलाच्या ख्रिस्तावरील अविचल श्रद्धेचे द्योतक आहे. पौलाच्या असहाय्य अवस्थेत फिलिप्पै येथील ख्रिस्तमंडळीने त्याला साहाय्य केले होते म्हणून त्यांचे आभार मानण्याकरिता हे पत्र लिहिण्यात आले असले, तरी ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेत पौल त्यांना श्रद्धेत टिकून राहण्यासाठी बोध करतो. संकटांत व अडीअडचणींत त्यांनी ख्रिस्ताच्या अतुलनीय नम्रतेचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवावे व स्वार्थी महत्त्वाकांक्षा व अहंकार यांच्यावर विजय मिळवावा, असे मार्गदर्शन तो करतो. ख्रिस्त येशूमध्ये मिळालेले नवजीवन ही देवाने ख्रिस्ताद्वारे दिलेली अमूल्य कृपा असून, जे कोणी ह्या नवजीवनात टिकून राहतात व वाढत राहतात त्यांना स्वर्गीय आनंद व शांती मिळते, ह्याची पौल त्याच्या वाचकांना आठवण करून देतो. फिलिप्पै येथील ख्रिस्ती लोकांना पौलाच्या अंतःकरणात कसे मानाचे स्थान होते, तेही या पत्रामधून स्पष्ट झाले आहे. रूपरेषा विषयप्रवेश 1:1-11 पौलाची व्यक्तिगत परिस्थिती 1:12-26 ख्रिस्तामध्ये नवजीवन 1:27-2:18 तिमथ्य व एपफ्रदीत यांच्याकरता योजना 2:19-30 शत्रूंविषयी व धोक्यांविषयी इशारे 3:1-4:9 पौलाचे फिलिप्पै येथील मित्र 4:10-20 समारोप 4:21-23 |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India