फिलिप्पैकरांस 1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)शुभेच्छा 1 फिलिप्पै येथील बिशप व दीक्षित सेवक ह्यांच्याबरोबर ख्रिस्त येशूमध्ये श्रद्धा असणाऱ्या सर्व पवित्र लोकांना येशू ख्रिस्ताचे दास पौल व तिमथ्य ह्यांच्याकडून: 2 देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला मिळो. पौलाची कृतज्ञता व आनंद 3 प्रत्येक वेळी मला जेव्हा तुमची आठवण येते, तेव्हा मी आपल्या देवाचे आभार मानतो. 4-5 पहिल्या दिवसापासून आजपर्यंत शुभवर्तमानाच्या प्रसारातील तुमच्या सहभागितेमुळे मी तसे करतो. तुम्हां सर्वांसाठी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेस मी नेहमी आनंदाने विनंती करतो. 6 ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. 7 तुमच्या अंतःकरणात मला तुम्ही स्थान दिले आहे! म्हणून मला तुमच्याविषयी जे वाटते ते योग्यच आहे. कारण माझ्या तुरुंगवासात व शुभवर्तमानाचे समर्थन करण्यात ते तसेच प्रस्थापित करण्यात तुम्ही माझ्याबरोबर कृपेचे भागीदार आहात. 8 माझ्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हां सर्वांसाठी किती उत्कंठित आहे, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. 9 माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. 10 जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे 11 आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही नीतिमत्त्वाच्या फळांनी भरून जावे. पौलाच्या तुरुंगवासाचे सुपरिणाम 12 बंधूंनो, माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्या शुभवर्तमानाच्या वृद्धीला कारणीभूत झाल्या, हे तुम्ही समजावे, अशी माझी इच्छा आहे. 13 म्हणजे कैसराच्या राजवाड्यातील सर्व सैनिकांना व इतर सर्व लोकांना माझा तुरुंगवास ख्रिस्तासंबंधाने आहे, हे समजले आहे. 14 माझ्या तुरुंगवासामुळे पुष्कळ बंधुजनांचा प्रभूवरील भरवसा वाढला असून देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास त्यांना धैर्य मिळत आहे. 15 कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात आणि कित्येक सद्भावनेने करतात. 16 मी शुभवर्तमानासंबंधी प्रत्युतर देण्यास नेमलेला आहे, हे ओळखून काही जण प्रेमाने घोषणा करतात. 17 मात्र इतर काही जण ख्रिस्ताची घोषणा प्रामाणिकपणे करीत नाहीत. तुरुंगवासात माझ्या यातना वाढाव्यातम्हणून ते स्वार्थी महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन करीत आहेत. ख्रिस्ताची घोषणा होत असल्याबद्दल आनंद 18 मला काही फरक पडत नाही. अयोग्य हेतूने असो किंवा योग्य हेतूने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते, ह्यात मी आनंद मानतो व मानत राहीन; 19-20 कारण तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या साहाय्याने मला तुरुंगातून मुक्त होता येईल, हे मला ठाऊक आहे. माझी प्रबळ अपेक्षा व आशा ही आहे की, मी माझ्या जबाबदारीत उणा न पडता सर्व समयी आणि विशेषतः आता परिपूर्ण धैर्याने सर्वस्व पणास लावून जगण्याने अथवा मरण्याने ख्रिस्ताचा महिमा वाढवीत राहावे. जीवन की मरण, काय चांगले? 21 मला तर जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. 22 पण देहात जगण्यामुळे मला अधिक चांगले काम करता येणार असले, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. 23 मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे फार चांगले आहे. 24 मात्र मी देहात राहणे हे तुमच्याकरता अधिक गरजेचे आहे. 25 मला अशी खातरी वाटत असल्यामुळे मी राहणार आणि श्रद्धेमधील तुमची प्रगती व आनंद वाढत जावा म्हणून मी तुम्हां सर्वांजवळ राहणार, हे मला ठाऊक आहे. 26 जेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा येईन, तेव्हा ख्रिस्त येशूविषयीच्या तुमच्या अभिमानात अधिक परिपूर्णपणे सहभागी होईन. धीर धरावा म्हणून बोध 27 सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकात्मतेने शुभवर्तमानावरील विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर आहात. 28 विरोधकांना घाबरू नका; नेहमी धैर्य बाळगा. हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे आणि ते परमेश्वराने केले आहे. 29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे. 30 कारण मी जे युद्ध केले, ते तुम्ही पाहिले व आता मी जे करीत आहे त्याविषयी तुम्ही ऐकता, त्यात तुम्हीही माझ्याबरोबर सहभागी होत आहात. |
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India