Online Bible

- Reklamy -

स्तोत्रसंहिता 30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 30
एक स्तोत्र. मंदिराच्या समर्पण सोहळ्यासाठी एक गाणे, दावीदाचे स्तोत्र

1 याहवेह मी तुमची प्रशंसा करेन, कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही.

2 हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली आणि तुम्ही मला रोगमुक्त केले.

3 याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले; तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले.

4 अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.

5 त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो, पण त्यांची कृपा जन्मभर राहते. विलाप करणे केवळ रात्रभर राहील, परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.

6 माझ्या भरभराटीच्या वेळी मी म्हणालो, “मी कधीही डगमगणार नाही.”

7 याहवेह, तुमच्या कृपेने मला बळकट पर्वताप्रमाणे स्थिर केले होते, परंतु तुम्ही आपले मुख लपविले, तेव्हा मी भयभीत झालो.

8 याहवेह मी तुमचा धावा केला, मी प्रभूला कृपेची विनवणी केली.

9 मी चिरनिद्रीत होण्यापासून मी अधोलोकात जाण्यापासून काय लाभ? माती तुमची स्तुती करेल काय? ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष देईल काय?

10 याहवेह, माझे ऐका, मजवर दया करा; याहवेह मला साहाय्य करा.

11 तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले. तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली,

12 जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Následuj nás:



Reklamy