Online Bible

- Reklamy -

शास्ते 10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


तोला व याईर हे इस्राएल लोकांचे शास्ते

1 अबीमलेखानंतर इस्राएलाचे संरक्षण करायला इस्साखार वंशातील तोला बिन पुवा बिन दोदो हा पुढे आला. तो एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात शामीर येथे राहत असे.

2 त्याने तेवीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला; नंतर तो मृत्यू पावला; त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली.

3 त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला; त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला.

4 त्याला तीस मुलगे होते, ते तीस गाढवांवर स्वारी करत; गिलाद प्रांतात त्यांची तीस नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोथ-याईर म्हणतात.

5 याईर मरण पावला व त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली. अम्मोन्यांच्या हातून इस्राएल लोकांचा छळ

6 मग इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले; बआलीम व अष्टारोथ ह्या दैवतांची आणि अराम, सीदोन, मवाब, अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या दैवतांची ते सेवा करू लागले; त्यांनी परमेश्वराचा त्याग केला; त्याची सेवा ते करीनात,

7 म्हणून परमेश्वराचा कोप इस्राएलावर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या व अम्मोन्यांच्या हाती दिले.

8 यार्देनेच्या पलीकडे अमोर्‍यांच्या देशातील गिलाद प्रांतात राहणार्‍या सर्व इस्राएल लोकांना त्यांनी तेव्हापासून अठरा वर्षे हैराण करून त्यांच्यावर जुलूम केला.

9 अम्मोनी लोक यार्देन ओलांडून यहूदा, बन्यामीन व एफ्राइमाचे घराणे ह्यांच्यावर स्वार्‍या करत. ह्यामुळे इस्राएल लोक फार बेजार झाले होते.

10 मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, “आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बआलदैवतांची सेवा करून आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.”

11 तेव्हा परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसरी, अमोरी, अम्मोनी व पलिष्टी ह्यांच्या तावडीतून सोडवले;

12 तसेच सीदोनी, अमालेकी व मिद्यानी ह्यांनी तुम्हांला हैराण केले तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हांला त्यांच्या हातून सोडवले, नाही का?

13 तरी तुम्ही मला सोडले आणि अन्य देवांची सेवा केली म्हणून ह्यापुढे मी तुमची मुक्तता करणार नाही.

14 जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.”

15 तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराला म्हणाले, “आम्ही पाप केले आहे; तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे.”

16 मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.

17 मग अम्मोनी लोकांनी एकत्र जमून गिलाद येथे तळ दिला, तसेच इस्राएल लोकांनी गोळा होऊन मिस्पा येथे तळ दिला.

18 गिलादाचे सरदार एकमेकांना विचारू लागले, “अम्मोनी लोकांशी सामना सुरू करायला कोणता मर्द तयार आहे? तोच गिलाद येथील सर्व रहिवाशांचा नेता होईल.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Následuj nás:



Reklamy