Online Bible

- Reklamy -

उत्पत्ती 14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


अब्राम लोटाची सुटका करतो

1 शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदार्लागोमर आणि गोयिमाचा राजा तिदाल ह्यांच्या दिवसांत असे झाले की,

2 त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा ह्यांच्याशी युद्ध केले.

3 हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्‍यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र.

4 ते कदार्लागोमर ह्यांचे बारा वर्षे अंकित होते, पण तेराव्या वर्षी ते त्याच्यावर उठले.

5 चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या पक्षाचे राजे ह्यांनी येऊन अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाई लोकांना, हाम येथे जूजी लोकांना, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकांना

6 आणि होरी लोकांना त्यांच्या सेईर डोंगरात मार देऊन एल्-पारानाच्या जवळ रान होते तेथपर्यंत पिटाळून लावले.

7 मग मागे परतून एन्-मिशपात म्हणजे कादेश येथे ते आले. त्यांनी अमालेकी लोकांचा सगळा देश जिंकला व हससोन-तामार येथे राहणार्‍या अमोरी लोकांनाही मार दिला.

8 इकडे सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा हे त्यांच्याशी युद्ध करायला निघाले आणि सिद्दीम खोर्‍यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली.

9 एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक ह्यांच्याशी ते लढले; चार राजांनी पाच राजांशी सामना केला.

10 सिद्दीम खोर्‍यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या; सदोम व गमोरा ह्यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले.

11 तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्नसामग्री शत्रू लुटून घेऊन गेले.

12 अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता; त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली.

13 तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री ह्याला हे वर्तमान सांगितले, त्या वेळी तो अष्कोल व आनेर ह्यांचा भाऊ अमोरी मम्रे ह्याच्या एलोन राईत राहत होता; हे अब्रामाच्या जुटीतले होते.

14 आपल्या भाऊबंदांना पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.

15 त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.

16 त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली; त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट, त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले.


मलकीसदेक अब्रामाला आशीर्वाद देतो

17 कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे ह्यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला.

18 आणि शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्याला सामोरा आला; हा परात्पर देवाचा याजक होता.

19 त्याने त्याला असा आशीर्वाद दिला : “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो;

20 ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला.

21 मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला, “माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.”

22 पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की,

23 तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वहाणेचा बंद मी घेणार नाही; मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हांला कारण न मिळो;

24 ह्या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे; माझ्याबरोबर आलेले आनेर, अष्कोल व मम्रे ह्यांना वाटा मिळाला म्हणजे पुरे; त्यांना आपला वाटा घेऊ द्या.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Následuj nás:



Reklamy